प्रतिनिधी, नवी दिल्ली | १३ मे २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या दहशतवादविरोधी नव्या धोरणाची अधिकृत घोषणा केली असून, हे धोरण ‘नवीन सामान्यता’ (New Normal) ठरवले जाईल, असे स्पष्ट केले. उरी आणि बालाकोटच्या कारवायांनंतर आता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दहशतवादाला थेट आणि निर्णायक उत्तर दिले असल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.
या नव्या धोरणाचे तीन मुख्य आधार आहेत – भारताच्या अटींवर उत्तर देणे, अण्वस्त्रांच्या धमकीखाली लपणाऱ्या दहशतवादास शून्य सहनशीलता आणि दहशतवाद्यांमध्ये व त्यांना पाठिंबा देणाऱ्या सरकारमध्ये कोणताही फरक न ठेवणे.
मोदी म्हणाले, “भारत आता दहशतवाद्यांचे ठिकाणे नष्ट करेल, ती कोणत्याही देशात असोत, अण्वस्त्रांच्या नावाखाली दहशतवाद चालणार नाही. पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमक्यांमुळे आम्ही घाबरणार नाही.”
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी हवाई आणि ड्रोन हल्ले करून दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. पंतप्रधानांनी यावेळी पाकिस्तानच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना देखील आक्षेपार्ह ठरवले. “जेव्हा पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचतात, तेव्हा हे राज्य प्रायोजित दहशतवादाचे जिवंत उदाहरण असते,” असे मोदींनी स्पष्टपणे सांगितले.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की भारत सध्या लष्करी कारवाई थांबवली असली तरी ती ‘सस्पेंड’ केली आहे, बंद नाही. “पुढील काळात पाकिस्तान काय भूमिका घेतो, हे पाहून आम्ही आमची पुढील रणनीती ठरवू,” असे ते म्हणाले.
मोदींनी जागतिक समुदायालाही आवाहन केले की, ही युद्धाची वेळ नसली तरी ही दहशतवाद सहन करण्याचीही वेळ नाही. “शून्य सहनशीलताच चांगल्या भविष्यासाठी हमी देऊ शकतो. आतंकवाद आणि चर्चा, व्यापार आणि रक्तपात एकत्र जाऊ शकत नाहीत. पाकिस्तानसोबत चर्चा होणार असेल, तर ती केवळ दहशतवाद किंवा पाकिस्तानव्याप्त काश्मीरवरच होईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
या भाषणात त्यांनी अमेरिका, युरोपसह संपूर्ण जगाला एकत्र येण्याचे आवाहन केले, जेणेकरून दहशतवादाचा कायमचा नायनाट करता येईल.
Add a Comment