जळगाव | प्रतिनिधी –
“सरकारनं उपचार मोफत देण्यासाठी योजना सुरू केली… पण आमच्याकडून दोन लाख रुपये उकळले गेले. हे न्याय आहे का?” — हा सवाल एका रुग्णाच्या मुलाने यंत्रणेला विचारला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतरदेखील, जळगावमधील एका नामांकित खासगी संलग्न हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णाच्या नातेवाईकाकडून 2 लाख रुपये घेण्यात आल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे. रुग्णाच्या मुलाने याबाबत थेट योजनेच्या अधिकृत ई-मेलवर तक्रार दाखल केली असून, याला ग्रिव्हन्स क्रमांकही मिळाला आहे.
🏥 घटना नेमकी काय घडली?
रुग्ण अस्लम खान सुलतान खान यांना 2 मे 2025 रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत त्यांचा अर्ज मंजूर झाला होता. कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी होऊनही, नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार हॉस्पिटलने सांगितले की, “योजनेत वेळ लागतो, काही खात्री नाही. तत्काळ ऑपरेशन करायचं असल्यास रक्कम भरावी लागेल.”
रुग्णाचा मुलगा तौसीफ अहमद यांनी मिळालेल्या माहितीनुसार, तातडीनं पैसे उभे करत त्यांनी दोन टप्प्यांमध्ये एकूण ₹2 लाख भरले.
योजनेचा आधीच मंजुरी क्रमांक व वेळ नोंदवलेली असताना, ही रक्कम का घेतली गेली? — हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
अधिकृत तक्रार नोंदवली गेली आहे
17 मे 2025 रोजी योजनेच्या ई-मेलवर तक्रार सादर करण्यात आली असून, त्याला ग्रिव्हन्स आयडी: GR50872/2025 मिळाला आहे. तक्रारीमध्ये असा गंभीर आरोप करण्यात आला आहे की, ऑपरेशनपूर्वी आधारकार्ड घेऊन “ब्लँक कागदावर” जबरदस्तीने स्वाक्षरी घेतली गेली. नंतर त्या कागदाचा वापर चुकीच्या पद्धतीने झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
🧾 योजना मंजूर असूनही… पैसे का?
- रुग्णाचे नाव: अस्लम खान सुलतान खान
- एनरोलमेंट आयडी: ABPMJAY-MJPJAY/ENR/00727423
- अप्रूव्हल वेळ: 2 मे – 12:10 वाजता
- व्हेरिफिकेशन: 2 मे – 12:38 वाजता
- कार्ड प्रकार: ऑरेंज (राशन कार्ड: 000000726876)
- हॉस्पिटल: राज्य श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल
- आरोग्य मित्र: सागर कम्युनिटी (व्हेरिफाय – यश)
या सर्व माहितीवरून स्पष्ट दिसते की, योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली होती. परंतु तरीही पैसे उकळणे हे दिशाभूल करणारे कृत्य असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
फक्त आमचं नाही… इतरांचंही शोषण होतंय?
तक्रारदारांनी आशंका व्यक्त केली आहे की, “आमच्यासोबत जे झालं, ते नियोजित वाटतंय. इतर गरीब रुग्णांनाही अशा पद्धतीनं गंडवलं जात असेल.”
त्यांनी शासनाकडे केलेल्या मुख्य मागण्या:
- या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी
- आमच्याकडून घेतलेली रक्कम आम्हाला परत करण्यात यावी
- दोषी डॉक्टर व व्यवस्थापनावर कारवाई व्हावी
- इतर रुग्णांची फसवणूक टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात सरकारी योजना आहे कुणासाठी?
हजारो गरिबांच्या आशेचा किरण असलेल्या या योजनेचा गैरवापर होतोय का? ही योजना मोफत उपचारासाठी आहे, पण जर त्या नावाखाली रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील ? तर यंत्रणेकडे याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
Global News 24 Live या प्रकरणाच्या पुढील तपशीलावर लक्ष ठेवून आहे.
Add a Comment