मेहरून शिवरा वार्ड सीमांकनात अनियमितता; नागरिकांकडून आक्षेप
जळगाव, दि. 26 नोव्हेंबर:
जळगाव महापालिका क्षेत्रातील मेहरून शिवरा परिसरातील वार्ड क्रमांक 17 च्या मतदारसंख्येत गंभीर विसंगती आढळून आल्याचा आरोप करत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनतर्फे निवडणूक निर्णय अधिकारी, जळगाव महापालिका यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदविण्यात आला आहे. नागरिकांच्या निवेदनानुसार वार्ड क्रमांक 14, 16 आणि 18 मधील हजारो मतदारांना चुकीच्या पद्धतीने वार्ड क्रमांक 17 मध्ये समाविष्ट करून मतदारसंख्येचे असंतुलन निर्माण करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या नोंदीप्रमाणे जळगाव शहराची एकूण लोकसंख्या 4,60,228 तर एकूण मतदार 4,38,523 असून महापालिकेत एकूण 19 वार्ड आहेत. त्यानुसार प्रत्येक वार्डातील मतदारसंख्या साधारण समान असणे अपेक्षित असून 10 टक्के चढउतार परवानगीयोग्य आहे. मात्र प्रत्यक्ष प्रस्तावित विभाजनात या निर्देशांचे पालन न होत गंभीर अनियमितता दिसून येत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
अवलोकनात आढळलेले आकडे पुढीलप्रमाणे—
- वार्ड 14: लोकसंख्या 22,122 — मतदार 16,867
- वार्ड 18: लोकसंख्या 16,921 — मतदार 12,736
- वार्ड 19: लोकसंख्या 22,256 — मतदार 16,678
वरील तीनही वार्डांत मतदारसंख्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी आहे.
तर वार्ड 17 मध्ये लोकसंख्या 24,938 असून मतदार 26,959 दाखविण्यात आले आहेत. म्हणजेच या वार्डात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार नोंदवले गेल्याचे स्पष्ट दिसते.
निवेदनात नमूद केले आहे की वार्ड क्रमांक 14, 18 आणि 19 यांची बूथ स्तरावरील मतदारसूची थेट वार्ड क्रमांक 17 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. मतदारसूची क्र. 253, 258, 289, 290, 299 आणि 300 यांसह इतर बूथ सूची चुकीच्या पद्धतीने स्थलांतरित झाल्यामुळे वार्डनिहाय संतुलनाचा भंग झाला आहे, असे नागरिकांनी म्हटले आहे.
ही प्रक्रिया निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन असून वार्ड सीमांकनाची निष्पक्षता धोक्यात आल्यामुळे तत्काळ पुनरावलोकन करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच मूळ वार्डातील मतदारांना त्यांच्या संबंधित वार्डात पुनर्स्थापित करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे.
