जळगाव जिल्हा एकता संघटनेने पोलीस अधीक्षकांना भेटून केली मागणी; कायद्याची निपक्ष आणि पारदर्शक अंमलबजावणी आवश्यक

ग्लोबल न्यूज़ नेटवर्क,जळगाव, दि. २४ मार्च २०२५ – जळगाव शहरातील काही घटनांबाबत जळगाव जिल्हा एकता संघटनेने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी सुव्यवस्था राखण्यासाठी निपक्षपणे आणि पारदर्शकपणे काम करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. हिंसाचाराला कारणीभूत ठरणारी चिथावणी लक्षात घ्यावी, इतिहासाची हत्या बनवून वारंवार अशांतता पसरवण्याचे आणि जातीय मतभेदांना खतपाणी घालण्याचे प्रयत्न अत्यंत चिंताजनक असल्याचे संघटनेने नमूद केले. यासंदर्भात जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांनी चोख पावले उचलावीत, अशी विनंतीही त्यांनी केली.
संबंधितांवर कडक कारवाईची मागणी
संघटनेने दोन प्रकरणांमध्ये कडक कारवाईची मागणी केली आहे. पहिल्या प्रकरणात, जळगाव शहरातील एका प्रार्थनास्थळावर तलवार घेऊन साहित्याचे नुकसान करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या आरोपीचे हिस्ट्री शीट काढून ते पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले असून, त्याच्यावर यूएपीए (UAPA) किंवा मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची विनंती संघटनेने केली.
दुसऱ्या प्रकरणात, कायद्याचा पदवीधर आणि गोरक्षक असलेल्या व्यक्तीने एका गरीब शेतकऱ्याच्या गाई चोरून त्याला उदरनिर्वाहापासून वंचित ठेवले. या प्रकरणात पोलिसांनी आवश्यक कारवाई न केल्याने समाजमाध्यमांद्वारे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षकांनी त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
दोन्ही मागण्यांवर कारवाईचे आश्वासन
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, सादर केलेले कागदपत्रे, व्हिडिओ आणि पुराव्यांच्या आधारे निश्चितच न्याय मिळेल आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल.
शिष्टमंडळात कोणाचा समावेश?
शिष्टमंडळात फिर्यादी सलीम घासी खान, दुसऱ्या तक्रारीतील फिर्यादी रईस पिंजारी यांच्यासह सलीम खान, वहाब खान, समशेर खान, समीर खाटीक, समीर खान, बशीर पिंजारी, मेहमूद पिंजारी, अख्तर पिंजारी यांचा समावेश होता. तसेच, एकता संघटनेचे हाफिज रहीम पटेल, फारुक शेख, नदीम मलिक, सय्यद चांद, आरिफ देशमुख, मौलाना रहीम पटेल, अनिस शहा, अन्वर खान आदी उपस्थित होते.
जळगाव जिल्हा एकता संघटनेच्या या मागणीमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
