गणपती नगर-तांबापुरा दरम्यान ‘आंतरराष्ट्रीय सीमेसारखी’ व्यवस्था; नागरिकांच्या ये-जा स्वातंत्र्यावर निर्बंध?

जळगाव : शहरातील शामा कॉम्प्लेक्सच्या बाजूने मेहरूण-तांबापुरा परिसरातून थेट गणपती नगर, भारत हाऊस, रिंग रोड तसेच विविध भागांना जोडणारा महत्त्वाचा सार्वजनिक रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
विशेष बाब म्हणजे हा कोणताही खाजगी रस्ता नसून, जनतेच्या कराच्या पैशातून नुकताच सिमेंट काँक्रीटचा बांधण्यात आलेला सार्वजनिक शासकीय रस्ता आहे. या रस्त्यावर लोखंडी गेट बसवून नागरिकांच्या ये-जा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, यापूर्वीही हा रस्ता सकाळी ७ वाजता उघडला जात असे आणि रात्री १० वाजता बंद केला जात असे. मात्र आता गेल्या तीन महिन्यांपासून हा मार्ग पूर्णपणे बंद असून नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.
यामुळे रोजंदारी करणारे कामगार, नोकरी करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णालयाकडे जाणारे नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक सोयीसाठी बांधलेला रस्ता बंद असल्यामुळे वेळ, इंधन आणि पैशांचा अतिरिक्त खर्च नागरिकांना सहन करावा लागत आहे.
या संपूर्ण प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत:
● सार्वजनिक शासकीय रस्त्यावर गेट बसविण्याची परवानगी नेमकी कुणी दिली?
● महानगरपालिकेची अधिकृत मंजुरी घेण्यात आली होती का?
● सार्वजनिक रस्त्यावर विशिष्ट वेळ ठरवून तो उघडणे आणि बंद करणे कायद्याने मान्य आहे का?
● जर हा सार्वजनिक मार्ग असेल, तर तो सर्वसामान्य नागरिकांसाठी २४ तास खुला असणे अपेक्षित नाही का?
● रस्त्याच्या बांधकामासाठी लाखो रुपये खर्च झाल्यानंतर त्याचा वापर नागरिकांना रोखण्याचा अधिकार कोणाला दिला गेला?
● महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष का करत आहेत?

● जर गेट अनधिकृत असेल तर ते अद्याप हटविण्यात का आले नाही?
नागरिकांमध्ये आता अशी चर्चा सुरू आहे की, सार्वजनिक रस्त्याचे स्वरूप बदलून तो एखाद्या खाजगी मालमत्तेसारखा वापरला जात आहे का? कारण सार्वजनिक रस्त्यावर गेट लावणे, वेळ निश्चित करून प्रवेश देणे आणि नंतर संपूर्ण मार्ग बंद करणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
नागरिकांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित विभागाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, गेट लावण्याची परवानगी असल्यास ती सार्वजनिक करावी आणि हा मार्ग त्वरित सर्वसामान्यांसाठी खुला करावा, अशी मागणी केली आहे.


