Friday, July 10, 2026
Latest:
Latest:
Khandesh

एकता संघटने’च्या पाठपुराव्याला मोठे यश! पिंपळकोठा शाळेत ६ वीच्या वर्गाला तात्काळ मंजुरी; जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक


जळगाव:
जिल्ह्यातील पिंपळकोठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १५ उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या, विशेषतः गरीब कुटुंबातील चिमुकल्या मुलींच्या शैक्षणिक भविष्याचा गंभीर प्रश्न अवघ्या काही तासांत अत्यंत संवेदनशीलतेने निकाली निघाला आहे. ‘एकता संघटना’ आणि सजग नागरिकांच्या आक्रमक व सकारात्मक पाठपुराव्याला जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या तात्काळ प्रतिसादामुळे ६ वीच्या वर्गाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचले असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

गरीब विद्यार्थ्यांची अडचण

पिंपळकोठा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत उर्दू माध्यमाची सोय होती. मात्र, सहावीचा वर्ग मंजूर नसल्याने पाचवी उत्तीर्ण झालेल्या १५ निष्पाप बालकांचे शिक्षण थांबण्याच्या मार्गावर होते. या परिसरात तब्बल १० ते १५ किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये दुसरी कोणतीही उर्दू माध्यम शाळा उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत गरीब कुटुंबातील या मुलांना, विशेषतः मुलींना शिक्षणासाठी लांब अंतरावर जाणे अत्यंत कठीण होते. ही मंजुरी मिळाली नसती, तर या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असत

शिक्षण विभागाची कौतुकास्पद गती आणि सामूहिक प्रयत्न

हा विषय समोर आल्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जी तत्परता आणि संवेदनशीलता दाखवली, ती खरोखरच कौतुकास्पद आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करिश्मा जी नायर मॅडम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा एकाच वेळी ॲक्शन मोडमध्ये आली.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील साहेब यांच्या नेतृत्वात उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे साहेब , नरेंद्र चौधरी साहेब आणि शिक्षण विभागातील स्वाती मॅडम आणि
एरंडोलचे गटशिक्षणाधिकारी (BEO) राजेंद्र डी. महाजन यांनी स्थानिक स्तरावरून प्रस्तावाची कागदपत्रे वेगाने तयार करून घेतली त्यानंतर या संपूर्ण टीमने एकत्र येऊन, कोणत्याही तांत्रिक अडचणीत न अडकता अत्यंत गतीने काम केले. या संपूर्ण टीमच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ‘नॅचरल ग्रोथ’ (Natural Growth) अंतर्गत ६ वीच्या वर्गाला तात्काळ मंजुरी देण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे आदेश (Admission Letter) देखील जारी करण्यात आले.

प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे मिळाला न्याय!

या गंभीर समस्येचे वृत्त समोर येताच, जळगावचे जागरूक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. जमील देशपांडे साहेब यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवत थेट स्थानिक गटशिक्षणाधिकाऱ्यांशी (BEO) फोनवर संपर्क साधला. या प्रकरणातील तांत्रिक बाजू आणि नियम सविस्तर समजून घेत, त्यांनी प्रशासनाला तात्काळ वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीचा प्रस्ताव पाठवण्याबाबत आग्रही विनंती केली. त्यांच्या या समयसूचकतेमुळे आणि जागरूकतेमुळे या संपूर्ण प्रक्रियेला मोठी गती मिळाली.

नियम हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी असतात, ते अडवण्यासाठी नाही,” हे जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आपल्या गतिमान कारभारातून सिद्ध केले आहे. ‘एकता संघटने’च्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या या तत्परतेचे स्वागत केले आहे. गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष वाचल्याबद्दल पालकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि ‘एकता संघटने’ने जिल्हा परिषदेच्या माननीय सीईओ मॅडम, शिक्षणाधिकारी निलेश पाटील साहेब, गटशिक्षणाधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले आहेत.

ब्युरो रिपोर्ट: मतीन पटेल, ग्लोबल न्यूज २४ लाईव्ह, जळगाव.