IIM नागपूर: MBA प्लेसमेंटमध्ये विक्रमी पगार ₹69.57 लाख; 46% महिला विद्यार्थी
IIM नागपूर: MBA प्लेसमेंटमध्ये विक्रमी पगार ₹69.57 लाख; 46% महिला विद्यार्थी
नागपूर, प्रतिनिधी – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) नागपूरने 2023-25 च्या एमबीए बॅचसाठी 100% प्लेसमेंट नोंदवत एक मोठं यश मिळवलं आहे. यामध्ये सर्वाधिक वार्षिक पगाराचा आकडा ₹69.57 लाखांवर पोहोचला असून, ग्रीष्मकालीन इंटर्नशिपसाठीही सर्वाधिक ₹2.70 लाखांचं मानधन देण्यात आलं आहे.
विशेष बाब म्हणजे, यंदाच्या बॅचमध्ये एकूण 267 नियमित एमबीए पदवीधरांपैकी 120 महिला विद्यार्थीनी होत्या – म्हणजेच 46 टक्के. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढली आहे. 2022-24 च्या बॅचमध्ये महिला विद्यार्थिनींचं प्रमाण 43 टक्के होतं.
संस्थेचे संचालक डॉ. भीमराय मेट्री यांनी 9व्या दीक्षांत समारंभात माहिती देताना सांगितले की, “ही वाढ संस्था घेत असलेल्या समावेशकतेच्या दिशेने सकारात्मक पाऊल आहे. व्यवस्थापन शिक्षणात समतोल साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
प्लेसमेंट प्रक्रियेत मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, बीएनपी पारिबा, वेदांत यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी सहभाग घेतला. तीन विद्यार्थ्यांना विक्रमी पगाराचे ऑफर मिळाले तर चार जणांना आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट मिळाले.
प्लेसमेंटसाठी सरासरी पॅकेज ₹18.07 लाख इतकं होतं, तर सरासरी इंटर्नशिप स्टायपेंड ₹89,856 इतकं नोंदवण्यात आलं.
या वर्षी एकूण 329 एमबीए विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं, यामध्ये 267 नियमित एमबीए, 35 पुणे कॅम्पसमधील कार्यकारी एमबीए आणि 27 नागपूर कॅम्पसचे कार्यकारी एमबीए विद्यार्थी सहभागी होते.
डॉ. मेट्री यांनी या यशाचे श्रेय करिअर डेव्हलपमेंट सर्व्हिसेस (CDS) आणि विद्यार्थी प्लेसमेंट समितीला दिलं.
त्यांनी सांगितलं की, “या वर्षी अंतिम प्लेसमेंटसाठी 89 नवीन कंपन्या आणि इंटर्नशिपसाठी 98 कंपन्या पुढे आल्या. यामधून IIM नागपूरवरील उद्योगविश्वाचा वाढता विश्वास स्पष्ट दिसतो.”
Add a Comment