प्रस्ताव; घटत्या प्रवेशसंख्येवर उपाय
प्रतिनिधी, नवी दिल्ली | १३ मे २०२५
देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये MTech अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घसरत असल्याने, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ५०% ने वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे ठेवला आहे.
AICTE ने शिक्षण मंत्रालयाकडे मागणी केली आहे की, सध्या दरमहा दिली जाणारी ₹12,400 शिष्यवृत्ती किमान ₹18,600 इतकी करावी. ही मागणी सर्वप्रथम जून 2024 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर मार्च 2025 मध्ये पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवण्यात आले. ही रक्कम मागील वेळी २०१५ साली वाढवण्यात आली होती, जेव्हा शिष्यवृत्ती ₹8,000 वरून ₹12,400 करण्यात आली होती.
MTech अभ्यासक्रमात घसरण का?
AICTE च्या आकडेवारीनुसार, 2018-19 मध्ये देशभरात MTech/ME अभ्यासक्रमांची एकूण मंजूर क्षमता 1.81 लाख इतकी होती, जी 2023-24 मध्ये घटून 1.30 लाख झाली आहे. पण अधिक धक्कादायक बाब म्हणजे 2022-23 मध्ये फक्त 44,000 विद्यार्थी MTech मध्ये दाखल झाले, म्हणजेच सुमारे 66% जागा रिकाम्या राहिल्या.
शिष्यवृत्ती योजनेंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील अर्ध्यावर आली आहे – 2018-19 मध्ये ही संख्या 11,926 होती, तर 2022-23 मध्ये केवळ 5,176 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली.
AICTE च्या मते, विद्यार्थी BTech पूर्ण केल्यावर थेट नोकरी करण्यास किंवा परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे MTech अभ्यासक्रमातील आकर्षण कमी होत चालले आहे. ही घसरण भविष्यात उच्च शिक्षण आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अध्यापनासाठी आवश्यक असलेल्या पदवीधारकांची कमतरता निर्माण करू शकते, असा इशारा AICTE ने दिला आहे.
GATE शिवाय शिष्यवृत्तीचा प्रस्ताव
AICTE ने आणखी एक महत्त्वाचा प्रस्ताव शिक्षण मंत्रालयासमोर ठेवला आहे की, GATE परीक्षा न देता AICTE मान्यताप्राप्त संस्थांतील 8.5 CGPA किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळावी. यामुळे अधिक विद्यार्थ्यांना MTech साठी प्रोत्साहन मिळेल, असे AICTE चे म्हणणे आहे.
इतर शिष्यवृत्तींची वाढ आणि AICTE ची मागणी
2023 मध्ये JRF (ज्युनियर रिसर्च फेलो) आणि SRF (सीनियर रिसर्च फेलो) शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली होती. JRF साठी रक्कम ₹31,000 वरून ₹37,000 आणि SRF साठी ₹35,000 वरून ₹42,000 करण्यात आली. त्याच्या तुलनेत MTech विद्यार्थ्यांना मिळणारी ₹12,400 शिष्यवृत्ती ही खूपच कमी आहे, असे तज्ज्ञ समितीनेही स्पष्ट केले आहे.
Add a Comment