
ग्लोबल न्यूज़ 24 लाइव नेटवर्क: राज्यातील महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत ‘पिंक ऑटो’ साठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
राज्यातील अनेक महिला रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांकडून महिलांना प्रवासी वाहतूक रिक्षा खरेदीसाठी कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ‘पिंक ऑटो’ संकल्पना राबवली जात आहे. सध्या २० महिला स्वतःच्या मेहनतीने रिक्षा चालवत आहेत. मात्र, शासकीय अनुदानाचा अभाव असल्यामुळे अनेक महिलांना हा व्यवसाय सुरू करणे कठीण झाले आहे.

मुख्यमंत्री अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. मात्र, महिलांसाठी प्रवासी वाहतूक रिक्षा खरेदीसाठी कोणताही निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या योजनेत ‘पिंक ऑटो’ साठी कर्ज मंजूर करावे आणि राष्ट्रीयकृत बँकांना याबाबत त्वरित सूचना द्याव्यात, अशी मागणी जमील देशपांडे यांनी केली आहे.
महिलांना कर्ज मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि अधिक महिला सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीत योगदान देऊ शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्यमंत्री लवकरच सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Add a Comment