
ग्लोबल न्यूज़ 24 लाइव नेटवर्क: कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त इकरा उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सालार नगर येथे मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला उजाळा देत कविता, बडबडगीते, बालगीते आणि महाराष्ट्र गीत सादर केले.
मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी शुद्धलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जकवान अँड ग्रुपने बालगीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. अमान मुद्दास्सीर, जोहर सय्यद, अरहान शेख, मोहम्मद उमर, रेहान बागवान, हुजेफा खान, अब्दुल्ला शेख, मुनीब खान, फरान शेख आणि फरीद जुबेर खान या विद्यार्थ्यांनी मराठीतील विविध कविता सादर केल्या. साद जावेद यांनीही सुंदर काव्यरचना सादर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हारून बशीर सर होते. मराठी विषय समिती प्रमुख **जाकीर खान सर सदस्य शहनाज शेख मॅडम तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. हारून बशीर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले. “मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. संत साहित्य, लोककला, अभंग, भारूड, तमाशा आणि आधुनिक मराठी साहित्य यातून मराठीचा गोडवा जाणवतो. ही भाषा शिकण्यापुरती न ठेवता दैनंदिन जीवनात वापरणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवीचा विद्यार्थी तोहीद खान यांनी केले, तर मराठी शिक्षक वाजीत पठाण सर यांनी आभारप्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Add a Comment