
ग्लोबल न्यूज़ 24 लाइव नेटवर्क: पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील लोकांना यात्रेमध्ये व्यापार करण्यास मज्जाव करणारा ठराव संमत केल्याच्या निषेधार्थ जळगाव एकता संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना निवेदन दिले आहे.
असविधानिक ठरावाचा निषेधएकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर ठराव हा असंविधानिक असून सामाजिक सौहार्द बिघडवणारा आहे. शेकडो वर्षांपासून सर्वधर्म समभावाने शांततेत साजरी होणाऱ्या यात्रेमध्ये असा भेदभाव करणारा निर्णय घेणे हा भारतीय संविधानाच्या मुलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. या ठरावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात, म्हणून सरकारने तत्काळ हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरपंच व ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी
एकता संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जात मढी गावाचे ग्रामसेवक अनिल सूर्यभान लवांडे आणि सरपंच संजय बाजीराव मरकड यांना त्वरित निलंबित करून त्यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, सभेत उपस्थित राहून ठरावाला समर्थन देणाऱ्या ग्रामस्थांवरही कारवाई व्हावी, तसेच ग्रामविकास मंत्री व मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून हा ठराव तत्काळ रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आश्वासन
निवेदन स्वीकारताना अपर जिल्हा दंडाधिकारी भीमराव दराडे यांनी एकता संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वस्त केले की, हा असंविधानिक ठराव शासन दरबारी पोहोचवला जाईल व अशा प्रकारची पुनरावृत्ती रोखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल
या निवेदन सादर करण्यासाठी हाफिज शफिक, फारुक शेख, मजहर पठाण, मतीन पटेल, अनिस शहा, सलीम इनामदार, युसुफ पठाण, उमर कासिम, शाहिद तेली, रेहान पिंजारी, बागवान, इमरान शेख, समीर शेख आदींचा समावेश होता.

Add a Comment