
ग्लोबल न्यूज़ 24 लाइव, जळगाव :
जिद्द असेल तर वाट सापडते” हे पुन्हा एकदा खरं ठरवलं आहे चोपडा तालुक्यातील योगिता ताई यांनी. पुरुषप्रधान व्यवसाय समजल्या जाणाऱ्या रिक्षाचालकाच्या क्षेत्रात त्यांनी दमदार पाऊल ठेवत चक्क चोपडा शहरातील पहिल्या महिला पिंक रिक्षा चालक-मालक होण्याचा मान पटकावला आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, ज्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात योगिता ताईंना पिंक रिक्षा सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमासाठी मराठी प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब जळगाव यांनी विशेष पुढाकार घेतला.
पाच वर्षांपासून मराठी प्रतिष्ठानतर्फे महिलांना रिक्षा मालकी हक्क देण्याचा आणि त्यासाठी प्रशिक्षण, डाऊन पेमेंटची सुविधा देण्याचा उपक्रम राबवला जात आहे. आतापर्यंत २२ महिला शहरात पिंक रिक्षा चालवत असल्या, तरी ग्रामीण भागातून या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या योगिता ताई या पहिल्याच महिला आहेत.
योगिता ताईंचा संघर्ष, आत्मविश्वास आणि धैर्य हा इतर महिलांसाठी दीपस्तंभ ठरणारा आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रसाद यांनीही त्यांचा गौरव करताना म्हटले की, “ही फक्त एक रिक्षा नाही, तर ती महिलांच्या स्वाभिमानाची आणि सक्षमतेची चळवळ आहे. ग्रामीण भागातील महिलांनी पुढे येणे ही समाजासाठी सकारात्मक दिशा दाखवणारी गोष्ट आहे.”
या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष अॅड. सागर चित्रे, माजी अध्यक्ष जितेंद्र ढाके, पराग अग्रवाल, डॉ. चंद्रशेखर सिकची, रितेश जैन, प्रमोद नारखेडे, जयवर्धन नेवे, उद्योजक सुबोध चौधरी, डॉ. सृष्टी सुमोल चौधरी, अश्विन राणे यांच्यासह मराठी प्रतिष्ठानच्या डॉ. सविता नंदनवार, सौ. निलोफर देशपांडे, सौ. हर्षाली चौधरी, सौ. खुशबू जुबेर देशपांडे आणि संदीप पाटील यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या शेवटी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले व अशा उपक्रमांद्वारे “महिलांना चालना देण्याचे कार्य हेच आमचे सामाजिक कर्तव्य आहे,” असे स्पष्ट शब्दांत नमूद केले.

Add a Comment