पिंपळकोठा ZP शाळेत ५ वी नंतर शिक्षण ठप्प! १० किमी परिसरात शाळाच नाही १५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सध्या तीव्र अंधारात सापडले आहे.

जळगाव (ग्लोबल न्यूज 24 लाइव वृत्तसेवा):
जिल्ह्यातील पिंपळकोठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सध्या तीव्र अंधारात सापडले आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची सोय आहे, मात्र पुढील शिक्षणासाठी म्हणजेच सहावी आणि सातवीचे वर्ग सुरू न झाल्याने गरिबांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या परिसराच्या १० किलोमीटरच्या त्रिज्येत दुसरी कोणतीही उर्दू माध्यमाची शाळा उपलब्ध नाही. त्यामुळे पाचवी उत्तीर्ण झालेल्या या १५ निष्पाप बालकांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांची भेट आणि धक्कादायक खुलासा
मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून यावर कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट त्यांनी या अत्यंत गंभीर विषयावर उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तपासात ही अत्यंत धक्कादायक बाब समोर आली की, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि स्थानिक गट शिक्षणाधिकारी (BEO) यांच्या निष्काळजीपणामुळे वरिष्ठ कार्यालयाकडे सहावीचा प्रस्ताव पाठवलाच गेला नव्हता! ही केवळ प्रशासकीय सुस्ती नसून १५ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ चालवला आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत *’ग्लोबल न्यूज 24 लाइव’चे मुख्य प्रतिनिधी *मतीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली आज जळगाव जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील साहेब यांची भेट घेऊन त्यांना रीतसर निवेदन देण्यात आले. या भेटीदरम्यान एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे.
शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी स्पष्ट केले की आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ‘नॅचरल ग्रोथ’ (Natural Growth) अंतर्गत ६ वी आणि ७ वीच्या वर्गांना मंजुरी देण्यास पूर्णपणे तयार आहोत. आम्ही यासंबंधीचा प्रस्ताव मागवला होता. परंतु, स्थानिक गट शिक्षणाधिकारी (BEO) कार्यालयाकडून अद्याप असा कोणताही प्रस्ताव आमच्या टेबलवर आलेला नाही.”

शिक्षणाधिकाऱ्यांनी पुढे आश्वासन दिले की, जर हा प्रस्ताव येत्या सोमवारपर्यंत आमच्याकडे सादर केला, तर मंगळवारी आम्ही या वर्गांना तात्काळ मंजुरी देऊ.
बालकांच्या मानसिकतेवर आणि भविष्यावर खेळ? (तांत्रिक व वैज्ञानिक बाजू)
या प्रकरणात एक अत्यंत संवेदनशील तांत्रिक आणि मानसशास्त्रीय मुद्दा उपस्थित होत आहे. बालमानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, एखादा विद्यार्थी ज्युनिअर, सिनिअर केजी आणि पहिली ते पाचवीपर्यंत पूर्णपणे उर्दू माध्यमातून शिकला असेल, तर त्याला सहावीत अचानक मराठी किंवा इंग्रजी माध्यमात ढकलणे अत्यंत घातक ठरू शकते.

- भाषेच्या या अचानक बदलामुळे मुलांच्या मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो.
- संकल्पना न समजल्यामुळे हुशार मुलेही अभ्यासात मागे पडतात (Dull होतात) आणि त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो.
RTE कायद्याची सरळ धज्ज्या!
नियमांनुसार नवीन वर्ग सुरू करण्यासाठी ३५ विद्यार्थ्यांची अट सांगितली जात असली, तरी RTE Act (शिक्षण हक्क कायदा) नुसार देशातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे. केवळ पटसंख्या कमी आहे म्हणून या १५ मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. कायदा कोणत्याही बालकाला शिक्षणापासून दूर ठेवण्याची परवानगी देत नाही. मग प्रशासकीय अधिकारी या नियमांवर बोट ठेवून गरिबांच्या मुलांचे वर्ष का बर्बाद करत आहेत?
‘ग्लोबल न्यूज’चा थेट सवाल: जबाबदार कोण?
येत्या सोमवारपर्यंत हा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांच्या टेबलवर पोहोचला नाही, तर ‘ग्लोबल न्यूज 24 लाइव’ या अन्यायाविरोधात जनतेच्या दारात जाऊन तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा पालकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
ब्युरो रिपोर्ट: मतीन पटेल, ग्लोबल न्यूज 24 लाइव, जळगाव.
