Khandesh

जळगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; कारवाई कोण करणार, जबाबदारी कोणाची?

एमआयडीसीसह शहरातील विविध भागांत खुलेआम सुरू असल्याची नागरिकांची तक्रार; कारवाई काही दिवसांपुरतीच मर्यादित राहते का? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह ?

एमडी ड्रग्जविरोधात झालेल्या कारवाईप्रमाणे इतर अवैध धंद्यांविरोधातही कायमस्वरूपी मोहीम राबवली जाणार का?

जळगाव | Global News 24 Live

जळगाव शहरात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी आता नवीन राहिलेल्या नाहीत. शहरातील विविध भागांसह विशेषतः एमआयडीसी परिसरात दारू विक्री, सट्टा, पट्टा, चक्री, विमलसह विविध संशयित व बेकायदेशीर व्यवहार खुलेआम सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी हे प्रकार लपूनछपून नव्हे, तर उघडपणे सुरू असल्याचा आरोप होत आहे. मात्र, या प्रकारांवर कायमस्वरूपी आळा घालण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे

माध्यमांमध्ये एखादी बातमी प्रसिद्ध झाली किंवा अवैध धंद्यांचा मुद्दा चर्चेत आला की संबंधित यंत्रणांकडून काही दिवस हालचाली दिसतात. कारवाई होते, धावपळ सुरू होते; मात्र काही दिवसांनंतर पुन्हा तेच प्रकार सुरू झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे कारवाई केवळ बातमीपुरती आणि दोन दिवसांपुरतीच असते का, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीची जबाबदारी कोण तपासणार?

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू नाहीत, अशी माहिती संबंधित स्तरावर दिली जात असेल, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याची स्वतंत्रपणे पडताळणी करतात का? केवळ अहवाल मागविण्याऐवजी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी, अचानक तपासणी आणि स्वतंत्र पथकांमार्फत क्रॉस-चेकिंग केले जाते का?

एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी येत असतील, तर त्याची जबाबदारी निश्चित करण्याची यंत्रणा आहे का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचे उत्तर देण्याची गरज आहे.

कथित हप्ते वसुलीच्या चर्चेची स्वतंत्र चौकशी होणार का?

या प्रकरणात सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे कथित आर्थिक वसुलीबाबत समोर येणाऱ्या चर्चा. काही सूत्रांच्या माहितीनुसार, विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अवैध व्यवसायांशी संबंधित कथित वसुलीची व्यवस्था असल्याचे दावे केले जात आहेत. वाळू वाहतुकीच्या संदर्भातही काही भागांत एका वाहनामागे दरमहा पाच ते सहा हजार रुपयांच्या कथित वसुलीची चर्चा सूत्रांकडून करण्यात येत आहे.

इतकेच नव्हे, तर काही सूत्रांकडून या कथित वसुलीचे पैसे वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचत असल्याचे दावेही केले जात आहेत. आठवड्याला एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कथित वसुलीची चर्चाही समोर येत आहे. मात्र, या रकमा आणि दाव्यांची Global News 24 Live कडून स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. कोणत्याही अधिकारी किंवा व्यक्तीला दोषी ठरविण्याचा आमचा उद्देश नाही. मात्र, या दाव्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

जर या चर्चांमध्ये तथ्य नसेल, तर प्रशासनाने त्याबाबत स्पष्टता द्यावी; आणि तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

एमडी ड्रग्जविरोधातील कारवाईचे सातत्य इतर अवैध धंद्यांबाबतही दिसणार का?

गेल्या काही महिन्यांत जळगावात एमडी ड्रग्जसह अमली पदार्थांच्या कथित व्यवहारांबाबत गंभीर चर्चा होती. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील एक-दोन महिन्यांत या प्रकारांविरोधात झालेल्या कारवाईमुळे परिस्थितीत दिलासादायक बदल जाणवला आहे. संबंधित यंत्रणेने या मोहिमेत केलेल्या कारवाईचे स्वागतच केले पाहिजे.

मात्र, प्रश्न असा आहे की अमली पदार्थांविरोधात ज्या पद्धतीने कठोर भूमिका घेण्यात आली, त्याच पद्धतीने शहरातील इतर अवैध धंद्यांविरोधातही सातत्यपूर्ण कारवाई केली जाणार का?

कारण व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येत आहे. केवळ एका प्रकारच्या नशेच्या व्यवसायावर कारवाई करून चालणार नाही, तर सर्व प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांवर कायद्याप्रमाणे नियंत्रण आवश्यक आहे.

हॉटेल व्यावसायिकांना नियम, मग इतर व्यवसायांना वेगळे निकष का?

सामान्य हॉटेल व्यावसायिकांना परवाने, नियम आणि वेळेचे बंधन पाळावे लागते. रात्री ११ वाजल्यानंतर व्यवसाय बंद करण्याबाबत त्यांना सूचना दिल्या जातात. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईची शक्यता असते.

मग शहरात कथितरीत्या बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी असताना त्यांच्यावर प्रभावी कारवाई का होत नाही? कायदा सर्वांसाठी समान नाही का?

आमची भूमिका स्पष्ट आहे. जे व्यवसाय कायद्याने प्रतिबंधित आहेत, ते तातडीने बंद झाले पाहिजेत. जे व्यवसाय कायदेशीर परवान्यांच्या चौकटीत सुरू होऊ शकतात, त्यांनी सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच व्यवसाय करावा. केवळ जीएसटी भरल्याने प्रतिबंधित व्यवसाय कायदेशीर ठरत नाहीत.

प्रशासनाला काही थेट प्रश्न…

१. जळगाव शहर आणि एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांची अधिकृत तपासणी शेवटची कधी झाली?

२. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र पडताळणी होते का?

३. अवैध धंदे सुरू असल्याच्या वारंवार तक्रारी येऊनही ते पुन्हा सुरू होत असतील, तर जबाबदारी कोणाची निश्चित केली जाणार?

४. कथित हप्ते वसुलीच्या दाव्यांची आर्थिक आणि स्वतंत्र चौकशी होणार का?

५. या प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथक स्थापन केले जाणार का?

६. एमडी ड्रग्जविरोधात झालेल्या कारवाईप्रमाणे इतर अवैध धंद्यांविरोधातही कायमस्वरूपी मोहीम राबवली जाणार का?

ही कोणत्याही एका व्यक्तीविरोधातील मोहीम नाही. हा जळगाव शहराच्या सुरक्षिततेचा, तरुण पिढीच्या भविष्याचा आणि पोलीस प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे.

Global News 24 Live ची भूमिका स्पष्ट आहे. अवैध धंदे कोणत्याही भागात सुरू असोत, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन पारदर्शक चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी.

अवैध धंदे बंद करा किंवा कायद्याच्या चौकटीत जे शक्य आहे तेच सुरू राहू द्या; मात्र कायद्याची अंमलबजावणी निवडक पद्धतीने नको!

जळगावकरांना उत्तर हवे आहे—अवैध धंद्यांवर कारवाई कधी आणि जबाबदारी निश्चित कधी?

— Global News 24 Live | जनहितासाठी निर्भीड पत्रकारिता