“फोटोशूट नव्हे… निस्वार्थ सेवा!” आकाशवाणी चौकात रोज झाडांना जीवदान देणारे कपिल लुल्ला आणि त्यांचे सहकारी ठरतायत पर्यावरणाचे खरे रक्षक

जळगाव :
आजच्या वाढत्या तापमानाच्या आणि पर्यावरणाच्या गंभीर संकटाच्या काळात अनेक जण फक्त सोशल मीडियावर पर्यावरण वाचवण्याचे संदेश देताना दिसतात. मात्र काही लोक असेही आहेत, जे कोणतीही प्रसिद्धी, फोटोशूट किंवा राजकीय दिखावा न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पर्यावरणासाठी निस्वार्थपणे काम करत आहेत.

अशाच लोकांमध्ये आकाशवाणी चौक परिसरातील कपिल लुल्ला यांचे नाव सध्या विशेष चर्चेत येत आहे.
गेल्या 2018 पासून कपिल लुल्ला हे दररोज सकाळी साधारण 7:30 ते 8:00 वाजेच्या दरम्यान आकाशवाणी चौक परिसरात लावण्यात आलेल्या 50 ते 60 छोट्या झाडांना स्वतः पाणी घालण्याचे काम सातत्याने करत आहेत.
विशेष म्हणजे, या कामासाठी ना त्यांना कोणती प्रसिद्धी हवी आहे, ना फोटो, ना बातम्या…
उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेतही हातात पाण्याचे जार घेऊन ते प्रत्येक झाडाजवळ जातात आणि त्यांना जीवदान देतात.

यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अत्यंत मन हेलावून टाकणारे मत व्यक्त केले.
त्यांच्या मते,
“पर्यावरण खराब करण्यामागे आपणच जबाबदार आहोत. त्यामुळे प्रत्येक माणसाने झाडे लावली पाहिजेत, त्यांना जगवले पाहिजे. आज तापमान झपाट्याने वाढत आहे. भविष्यात जर झाडांची कत्तल सुरूच राहिली आणि नवीन झाडे लावली गेली नाहीत, तर परिस्थिती भयानक होऊ शकते.”
ते पुढे म्हणाले की,
“झाडे ही फक्त माणसांसाठी नाहीत, तर पक्ष्यांसाठीही आधार असतात. त्यांना बसण्यासाठी, राहण्यासाठी, सावलीसाठी झाडे म्हणजे घरच असते.”
विशेष म्हणजे कपिल लुल्ला यांच्यासोबत त्यांचे सहकारी ताप्ती पाठ बँधारे विकास महामंडल के अधिकारी हे देखील या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत. तसेच त्यांचे मित्र सुनील भाई आणि शांतोष अहूजा हे देखील या मोहिमेत मदतीसाठी कायम पुढे असतात.

आज अनेकदा पावसाळ्यात राजकीय नेते मोठ्या थाटामाटात वृक्षारोपण करतात, फोटो काढतात, बातम्या प्रसिद्ध होतात… मात्र काही दिवसांनी त्या झाडांकडे कोणी फिरकूनही पाहत नाही.
मात्र कपिल लुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे काम हे खऱ्या अर्थाने “वृक्षसंवर्धन” काय असते याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
समाजात अशाच निस्वार्थ लोकांची गरज आहे.
प्रत्येक घरासमोर किमान दोन झाडे लावून त्यांना जगवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेतली, तरच भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ हवा, सावली आणि सुरक्षित पर्यावरण मिळू शकते.

