महाराष्ट्रभर विविध जिल्हे व शहरांमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

महाराष्ट्र : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संवैधानिक हक्कांसाठी कार्यरत असलेल्या “सकल मुस्लिम यूथ महाराष्ट्र” या राज्यस्तरीय संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संघटनेचे नोंदणी क्रमांक माह/1826/2025 असून राज्यभर युवकांना संघटित करण्याच्या उद्देशाने विविध जिल्हे, तालुके आणि महानगरांमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
ही नियुक्ती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अख्तर ए.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य, शैक्षणिक जनजागृती, युवक संघटन बांधणी आणि संवैधानिक हक्कांसाठी प्रभावीपणे काम करण्याचे उद्दिष्ट संघटनेसमोर ठेवण्यात आले आहे.

जाहीर करण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीनुसार इस्लामपूर येथील मकसूद भादी यांची पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी, फैजपूर येथील डॉ. दानिश शेख यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी, नंदुरबार येथील मुजम्मील हुसेन यांची नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी, जळगाव येथील समाजसेवक व पत्रकार मतीन पटेल यांची जळगाव महानगर अध्यक्षपदी, श्रीरामपूर येथील शाहरुख शेख यांची नगराध्यक्षपदी, शेख जुबेर यांची पूर्णा तालुका अध्यक्षपदी तसेच अयाज पठाण यांची वटूर विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे कन्वीनर आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सदस्य नोंदणी अभियान, सामाजिक सलोखा अभियान, युवक प्रबोधन कार्यक्रम, शैक्षणिक मदत उपक्रम तसेच समाजात वाढत चाललेल्या द्वेष आणि अन्यायाविरोधात जनजागृती मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
राज्यभरातील विविध भागांतील युवकांना एकत्र आणून सामाजिक परिवर्तनासाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करण्याच्या दृष्टीने ही नवी कार्यकारिणी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

