KhandeshSports

“श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल” सज्ज; उद्घाटनाच्या प्रतीक्षेत जळगावच्या खेळाडूंच्या अपेक्षा

ग्लोबल न्यूज 24 लाईव्ह | मतीन पटेल

जळगाव : शहरातील “श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल” येथील विकास व दुरुस्तीची कामे आता अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच संकुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून खेळाडू, विद्यार्थी आणि पालक ज्या आधुनिक सुविधांच्या प्रतीक्षेत होते, त्या सुविधा आता प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहेत.

क्रीडा संकुल परिसरात विविध खेळांसाठी स्वतंत्र मैदानं, गेम रूम, स्विमिंग पूल, खेळाडूंना आवश्यक सुविधा, रंगरंगोटी तसेच इतर दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली आहेत. काही किरकोळ कामे शिल्लक असली तरी संपूर्ण प्रकल्प आता उद्घाटनाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

यावर्षी सुरू असलेल्या दुरुस्ती आणि विकासकामांमुळे समर कॅम्प आयोजित करता आला नाही. मात्र, येणाऱ्या काळात हे क्रीडा संकुल हजारो मुलांसाठी आणि होतकरू खेळाडूंसाठी महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना येथे सराव, प्रशिक्षण आणि स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

जळगाव जिल्ह्याला केंद्र स्तरावर क्रीडा क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधित्व लाभले आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्रीमहोदय, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊन क्रीडा संकुलाचे उद्घाटन लवकरात लवकर करावे, अशी अपेक्षा खेळाडू, पालक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून तो शिस्त, आत्मविश्वास आणि करिअर घडविण्याचे प्रभावी माध्यम मानले जाते. जळगावातील अनेक मुलांमध्ये मोठी क्षमता आणि कौशल्य असून, योग्य सुविधा व प्रोत्साहन मिळाल्यास भविष्यात हेच खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करू शकतात.

जिल्हा क्रीडा संकुलाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने जळगावातील खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत असून, लवकरच या संकुलाचे उद्घाटन होऊन खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.